नेमकं काय म्हटलं बावनकुळे यांनी? विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपात येवू नये म्हणून सरकार पाडण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. त्यामुळे जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा आम्हाला 184 आमदारांचा पाठिंबा असेल असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंना टोला उद्धव ठाकरे हे सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. विकास हा उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीये, त्यामुळे त्या विषयावर बोलून काही फायदा नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत, ते जैन समाजाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.